स्थैर्य, फलटण दि.३ : ब्रिटीश सैन्य दलातील महार बटालीयनने 200 वर्षांपूर्वी पेशव्यांच्या विरुद्ध लढताना दाखविलेल्या शौर्याचे स्मरण आणि त्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ ब्रिटिशांनी उभारलेल्या विजयस्तंभ प्रतिकृतीस अभिवादन करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि शहर व तालुक्यातील मान्यवरांसह जनतेने शुक्रवार दि. 1 जानेवारी रोजी दिवसभर मोठी गर्दी केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारुन, मानवंदना देण्याचे नियोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते, परंतू जिल्ह्यात लावण्यात आलेली जमावबंदी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि नूतन वर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, सदरचा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मृतिभवन, भीमस्फूर्ती भूमी (शेरी), मंगळवार पेठ, फलटण येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक उपस्थित होते.
प्रतिवर्षी दि. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी फलटण शहर व तालुक्यासह देशभरातून आंबेडकरी अनुयायी, विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था/ संघटना प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित असतात, यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव येथे न जाता, गावागावात आहे तेथूनच विजयस्तंभाला अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले होते, शहर व तालुक्यातील संस्था, संघटना व नागरिकांनी 4/4 च्या गटांमध्ये येऊन, विजयस्तंभ प्रतिकृतीस अभिवादन करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (2021) फलटणच्यावतीने करण्यात आले होते. त्याप्रमाणे नागरिक, संस्था/संघटना व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि भीमस्फूर्ती भूमी (शेरी), मंगळवार पेठ, फलटण येथे डॉ. आंबेडकर यांचा पुतळा व विजय स्तंभास अभिवादन केले.
प्रतिकृतीस मान्यवर व विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी यांनी मानवंदना दिली, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी जयंती महोत्सव समिती पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, नागरिकांनी घोषणा देऊन भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा केला.