स्थैर्य, म्हसवड दि.१० : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी सहभागी होवुन देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, अशा क्रांतिकारकांपैकी असलेले घडशी समाजाचे क्रांतिवीर रामचंद्र बाळोबा साळुंखे व रामचंद्र धोंडी धुमाळ (कोणगांवकर) यांचा स्मृतीदिन म्हसवड येथील घडशी समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी दोन्ही क्रांतिवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन त्याचे पुजन समाजबांधवांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आमच्या पुर्वजांनी सहभागी होवुन या समाजाचे स्थान उंचावले असुन त्यांच्या बलीदानाने घडशी समाज खरेतर हा लढवय्या समाज असल्याचे दाखवुन दिले आहे. यापुढे या क्रातीवीरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन या समाजातील युवकांनी आपली वाटचाल सुरु ठेवावी व समाजाचे प्रश्न सोडवावेत. यापुढे हा समाज या क्रांतिवीरांप्रमाणे आपले प्रश्न सोडवण्यासाठी क्रांतिकारी पाऊले उचलुन घडशी समाज हा रडणारा नव्हे तर लढणारा समाज असल्याचे दाखवुन देईल अशा प्रकारच्या भावना समाजातील जेष्ठ व युवकांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी शहर व परिसरातील समाजबांधव उपस्थित होते.