स्थैर्य, सातारा, दि. ०८ : सातारा शहराजवळील गेंडामाळ परिसरात असलेल्या फाशीचा वड येथील सतरा हुतात्म्यांच्या बलीदानाचा आजचा दिवस. म्हणून त्या हुतात्म्यांना सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम , उपाध्यक्ष किशोर शिंदे , तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पांजली वाहून क्रांतिकारी अभिवादन केले.
सातारा जिल्ह्याचे भारताच्या इतिहासातील स्थान महत्वपूर्ण आहे. अजिंक्यतारा किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची तिसरी राजधानी, छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र शाहू यांनी येथून राज्यकारभार पहिला. स्वातंत्र्याच्या लढाईत साताऱ्याच्या प्रतिसरकारची ख्याती देशभर पोहोचली. साताऱ्याच्या इतिहासातील अजून एक अभिमानाची घटना म्हणजे रंगो बापूजी गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात १८५७ साली केलेले बंड होय. या बंडकरयांचा कट उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या तीन सदस्यीय न्यायदान मंडळाने या खटल्यात १७ जणांना दोषी ठरवून देहदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेची आजच्याच दिवशी १८५७ रोजी गेंडामाळ भागातील फाशीचा वड येथे अंमलबजावणी करण्यात आली. म्हणुन या हुतात्म्यांना पुष्पांजली वाहण्यात आली. सातारा नगरपालिकेचे अभियंता सुधीर चव्हाण , हेही उपस्थित होते.
दरम्यान विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने विजय मांडके, प्रा डॉ. विजय माने, महेश गुरव, संकेत माने- पाटील शुभम ढाले, रश्मी लोटेकर, भंडारे यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी इतिहासाला उजाळा देण्यात आला.
राजधानी सातारा त्रिशताब्दी महोत्सव समिती आणि सातारा नगरपालिकेने साताऱ्यातील गेंडामाळ येथे हुतात्मा स्मारक उभारले.