दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । मुंबई । प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. या सर्वांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत. कुशल राज्यकर्ती, रणधुरंधर, मुत्सद्दी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ”