दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्यातील नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकावून राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्य सैनिकांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करीत आहे. आपल्या पूर्वसुरींनी त्याग आणि कष्टातून हे स्वातंत्र्य मिळविले आहे. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी तुरूंगवास सोसला तर अनेकांनी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्याबरोबर आलेली कर्तव्येही आपण निभावली पाहिजेत. विशेषतः सिंगल यूज प्लास्टीकचा वापर बंद करून आपण आपल्या समाजाप्रति, देशाप्रति प्रेमाची भावना व्यक्त करू शकता, असेही श्री. फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.