स्थैर्य, मुंबई, दि. १२ : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वकालीन आदर्श राज्यकर्त्या होत्या. राजकारण, समाजकारण, धर्मपरायणतेच्या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च आदर्श निर्माण केला. जात, धर्म, पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून लोककल्याणाची कामं केली. परराज्यांशीही सहकार्याचे, सलोख्याचे संबंध राखले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी दाखवलेल्या मार्गानं राज्यकारभार करणं, जनतेला सुखी ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करुन त्यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना उजाळा दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अहिल्यादेवींनी त्यांच्या कारकिर्दीत देवळांचा, तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. मशिदी, दर्ग्यांसाठीही मदत केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत, जगन्नाथपुरीपासून सोमनाथपर्यंत अखंड भारतात लोकविकासाची कामं केली. त्यांनी उभारलेली मंदिरं, उद्यानं, अन्नछत्रं, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत. नर्मदा, गंगा, गोदावरी नद्यांवर घाट बांधण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. लोकांना सोबत घेऊन पडिक जमिनींचा विकास केला. करपद्धतीत, न्यायव्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाचा प्रसार केला. लोककलांना प्रोत्साहन दिलं. जीवनाच्या अखेरपर्यंत लोककल्याणाचा ध्यास घेऊन कामं केली. त्यांचं कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी, मार्गदर्शक राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.