दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । लातूर । आपल्या कार्यकर्तृत्वाने जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांना आज त्यांच्या ७७ व्या जयंती निमित्ताने बाभळगाव येथील विलास बाग येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी देशमुख कुटूंबिय तसेच मोठया जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनीक आदरांजली वाहण्यात आली. गुरूवार दि. २६, मे रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात आला. लातूरसह राज्यभरात यानिमीत्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृती स्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.
विलासबाग, बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, विलास कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख, सौ. सुवर्णाताई देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख,यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली.