स्थैर्य, मुंबई, दि.१४: आद्य समाजसुधारक, महान संत, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अभिवादनपर संदेशात म्हणतात की, महात्मा बसवेश्वर क्रांतिकारी संत होते. आध्यात्मिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रात वैचारिक सुधारणा, परिवर्तन घडवण्याचं क्रांतिकारी कार्य त्यांनी केलं. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ठ रुढी, जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद, कुळभेदाविरुद्ध लढा दिला. समतावादी, मानवतावादी विचारांचा पुरस्कार केला. महात्मा बसवेश्वरांच्या विचारातच सर्व समाजाला एकजूट ठेवून, सोबत घेऊन पुढे जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत बसवेश्वरांबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करुन आदरांजली वाहिली.