दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । “माजी प्रधानमंत्री, भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी देशातील जनमानसाशी एकरुप झालेल्या नेत्या होत्या. समाजातील सर्व घटकांसाठी आदरस्थानी होत्या. देशवासियांचं अपार प्रेम त्यांना लाभलं होतं. इंदिराजींनी भारताला जगातलं समर्थ, सक्षम, बलशाली राष्ट्र बनवलं. बांगलादेशची निर्मिती, बँकांचं राष्ट्रीयीकरण, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेसारख्या संघटनांचं नेतृत्व अशा भूमिका, निर्णयांमधून देशाची ताकद वाढवली. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला सन्मान मिळवून दिला. स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेच्या रक्षणासाठी त्यांनी प्राणांचं बलिदान दिलं. आजचा अखंड, मजबूत, शक्तिशाली भारत इंदिराजींच्या सर्वोच्च त्यागावर उभा आहे. त्याबद्दल देशवासीय त्यांचे कृतज्ञ राहतील. देशाच्या सर्वात कणखर नेत्या, लोकप्रिय प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी प्रधानमंत्री, भारतरत्न, स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले असून देशवासियांना राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.