स्थैर्य, मुंबई, दि. 1 : लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून उभारलेली लोकचळवळ, त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आपल्या सर्वांना देशासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमान्य टिळकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकमान्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वं केलं. देशवासियांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करुन एकजूट करण्याचं मोठं काम त्यांनी केलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. देशासाठी तुरुंगवास भोगला. लोकमान्य टिळकांसारख्या देशभक्तांमुळे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं रुपांतर सुराज्यात करण्याचा आपण निर्धार करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.