दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्यातील कृषीक्रांतीचे जनक, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची आज जयंती. त्यांच्या स्मृतींना, कार्याला, विचारांना भावपूर्ण अभिवादन, अशा शब्दात स्वर्गीय वसंतराव नाईक जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी, अथक कष्टातून, दूरदृष्टीच्या निर्णयातून राज्यात कृषीक्रांती घडवली. १९७२ च्या दुष्काळाच्या कठीण काळात राज्याचं नेतृत्वं केलं. त्यावेळची आव्हानं, आजच्या तुलनेत खूपच कठीण असूनही नाईक साहेब डगमगले नाहीत. आव्हानांना धीराने सामोरे गेले. त्यांनी संकटात संधी शोधली. संधीचं सोनं केलं. गरीबांच्या हातांना काम देण्यासाठी रोजगार हमीची योजना आणली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणं उपलब्ध केली. जलसंधारणाची कामं वाढवली. शेतीला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला. राज्यात कृषीक्रांती यशस्वीपणे घडवली. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वाला, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..