दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | “माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचं बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी अमूल्य योगदान दिलं. पाकिस्तानची फाळणी करुन बांग्लादेशची निर्मिती, आशियाई खेळांचं यशस्वी आयोजन, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेचं नेतृत्वं, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वं करताना इंदिराजींनी दूरदृष्टी, राजकीय कौशल्याचं दर्शन घडवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत प्रकल्प उभे राहिले. विकासाचा पाया भक्कम झाला. त्यांच्या साहसी नेतृत्वानं देशाला महासत्तेच्या वाटेवर आणून देशाचा गौरव वाढवण्याचं काम केलं. इंदिराजी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वकालिन महान नेत्या. देशाचं कणखर नेतृत्वं म्हणून त्यांचं स्थान इतिहासात अजरामर आहे. देशासाठी त्यांनी केलेला त्याग, त्यांचं नेतृत्वं, कर्तृत्व, त्यांचं बलिदान देशवासियांना कायम प्रेरणा देत राहील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय इंदिराजींच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.