कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

राज्यातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्राला शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने पाहिली तर आपल्याला पुण्यातही हेच दिसते. कोरेगाव भीमा येथे जे शूरवीर शहीद झाले. त्या सर्वांना अभिवादन करतो. हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावा आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी यंदाच्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश केला जाईल.  स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था आदी सुविधा करण्यास शासनाचे प्राधान्य राहील.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतू, कोरोनाच्या नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

पाश्चात्य देशांत प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्याने नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

शौर्य दिनाला येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुयायांना जयस्तंभास  सुलभतेने अभिवादन करता यावे यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केले होते. पीएमपीएल तर्फे बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.


Back to top button
Don`t copy text!