दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | देशाचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष, भारतरत्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला अखंड, एकसंध, मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी सरदार पटेलांनी केलेलं कार्य अलौकिक असून त्यासाठी ते सदैव स्मरणात राहील. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पावधीतच साडेपाचशेहून अधिक संस्थानांचं भारतात विलिनीकरण करुन त्यांनी अखंड, मजबूत, एकसंध देशाच्या निर्मितीचा पाया भक्कम केला. जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, बोलींची विविधता असलेल्या भारत देशाला एकत्र आणण्याचं आणि एकसंध ठेवण्याचं फार मोठं श्रेय सरदार पटेलांच्या दूरदृष्टीला, निर्णयक्षमतेला, कणखर नेतृत्वाला आहे. सरदार पटेलांना अपेक्षित पुरोगामी, प्रगतशील, सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या, सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या प्रगतशील भारताची निर्मिती करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सरदार पटेलांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.