दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । मुंबई । यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच एनसीसी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या एनसीसी सिनीयर एअर फोर्स विंगची छात्रसैनिक, वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने यापूर्वी 17 वेळा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याचे, तसेच गेली दोन वर्षे उपविजेतेपद जिंकल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या छात्रसैनिकांच्या आजवरच्या गौरवशाली कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राचे सर्व छात्रसैनिक ‘एकता व अनुशासन’ या ब्रीदाचे पालन करुन समर्पित वृत्तीने राष्ट्रसेवा करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर बॅनर)चा वाहक छात्रसैनिक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, उत्कृष्ट ‘गार्ड ऑफ ऑनर’साठी सन्मानित सिनीयर अंडर ऑफिसर गितेश डिंगर, सिनियर अंडर ऑफिसर सोनाली पाटील, सिनियर अंडर ऑफिसर राघवेंद्रसिंह या छात्रसैनिकांसह महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत आदी एनसीसी अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.