स्थैर्य, मुंबई, दि.५: मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कच-यापासून वीजनिर्मिती करण्याला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या बैठकीत कच-यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईत दररोज सुमारे ५ हजार मॅट्रिक टन कचरा गोळा होतो. या कच-याची याच ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. कच-याची विल्हेवाट लावताना प्रदूषण होते. मुंबईतील कचरा आणि प्रदूषण कमी व्हावं यासाठी पालिकेने कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प एक हजार कोटी रुपयांचा असून याद्वारे 25 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे.
मुंबईत कच-यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्ताव हा 2018 मध्ये मांडण्यात आला होता. मात्र, त्या प्रस्तावात भ्रष्टाचार असल्याचे कारण देत शिवसेनेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वीजनिर्मितीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. आज दोन वर्षांनी हा प्रस्ताव स्थायी समितीत पुन्हा एकदा मंजुरीसाठी आला. त्यावेळी मात्र शिवसेनेने कोणत्याही प्रकारचा विरोध न करता यासाठी मंजुरी दिली.
या प्रस्तावाविरोधात विरोधकांना मत मांडण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे या प्रस्तावाची मंजुरी ही नियमबाह्य आहे, असे पत्र समाजवादी पार्टीचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी स्थायी समितीला दिलं आहे.