
स्थैर्य, फलटण, दि. 12 नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या व्यापारी भेट दौऱ्याला फलटण शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा जनसंपर्क वाढवला असून, लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या सोबतच ज्येष्ठ नागरिकही त्यांच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.
समशेरसिंह नाईक निंबाळकर हे शहरातील विविध भागांत पायी फिरून व्यापाऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा थेट जाणून घेत आहेत. त्यांच्या या थेट संवादामुळे व्यापारी वर्गात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्यासमोरील अडचणी यावेळी स्पष्टपणे मांडल्या.
या दौऱ्यादरम्यान बोलताना समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मागील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “गेली ३० वर्षे शहरात एक हाती सत्ता असतानासुद्धा फलटण शहराचा सर्वांगीण विकास झाला नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘बकाल’ झालेल्या फलटण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण आणि आपला पक्ष कटिबद्ध आहोत, असा विश्वास ते व्यापारी आणि नागरिकांना देत आहेत. मूलभूत सुविधा पुरवणे आणि शहराला विकासाच्या नव्या वाटेवर नेणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या भूमिकेमुळे आणि थेट भेटीगाठींमुळे व्यापारी वर्गाकडून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

