दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । दहिवडी । देश एका अराजकतेच्या दिशेने जात असताना भारतीय संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध रीतीने काही फॅसिस्ट विचारवादी लोक करत आहेत. मंदिर-मस्जिद असे वाद पुन्हा उभे करून समाजातील सौहार्द पूर्ण वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे देशात पुन्हा धर्मांधता डोके वर काढत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाची शकले उडायला वेळ लागणार नाही त्यामुळे महामानवांच्या विचारातच देशाला एकसंध ठेवण्याची ताकद असून त्याच विचारांचे आचरण करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सोमिनाथ घोरपडे यांनी केले. ते मौजे वावारहिरे तालुका माण येथे महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवात बुद्ध पौर्णिमा दिवशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्यायावर आधारित समताधिष्ठित समाजाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी महामानवांचे विचार आत्मसात करावे लागतील.समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. जात, धर्म, पंथ याच्या पुढे जाऊन महामानवाने व महामातांनी सांगितलेले मानवतेचे नाते जपत समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.आज जगाला युध्दाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्ध देव नाही, बुद्ध परमात्मा नाही, बुद्ध ईश्वर नाही, बुद्ध मोक्षदाता नाही, तो मार्गदाता आहे त्या मार्गावर जाण्याचा संकल्प करूया.
यावेळी भंते बुद्धभूषण संघनायक व त्यांचा पवित्र श्रामनेर संघ यांची विचार मंचावर उपस्थिती होती. भंते बुद्धभूषण यांनी सर्वांना त्रिसरण पंचशील देणे व धम्मदेशना दिले. यावेळी मौजे वावरहिरे येथे बुध्द विहाराच्या निर्माणासाठी भिमज्योत तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी भोसले व विष्णू भोसले यांनी दहा गुंठे जागा बक्षीस पत्र करून दिली त्याबद्दल त्यांचा गावचे सरपंच वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवासी नायब तहसीलदार श्री महादेव आण्णा भोसले यांचा सेवानिवृत्ती मुळे व नवनियुक्त नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांचा मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. छोट्या चिमुकल्यांनी ही आपली मनोगते व्यक्त करुन महामानवांच्या विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
मौजे वावरहिरे ता.माण जिल्हा सातारा येथे तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व अहिल्याबाई होळकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव दिनांक १६ मे ते १७ मे २०२२ या कालावधीत संपन्न झाला.मौजे वावरहिरे येथे ह वर्ष संयुक्त जयंती महोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते.त्या निमित्ताने सलग दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सुवर्णमहोत्सवी वर्षात महामानवाबद्दल व त्यांच्या विचार कार्याबद्दल विचार व्यक्त करता आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई आयु. तानाजी भोसले, प्रमुख उपस्थिती मध्ये गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री चंद्रकांत दादा वाघ हे होते. तसेच कार्यक्रमाला राष्ट्रीय जनता पक्षाचे संदीप खरात पाटील,बामसेफ चे बाळासाहेब भोसले सर, माजी प्राचार्य पी.बी काळे सर उपस्थित होते.
भिमज्योत तरूण मंडळ,वावरहिरे, निवृत्त कक्ष अधिकारी तानजी भोसले, वसंतराव भोसले, मिलिंद भोसले, प्रा.सुकुमार भोसले, धनंजय भोसले, सुनिल भोसले, सदाशिव भोसले, संजय भोसले, भैय्या सावंत, सागर भोसले, शिवाजी तुकाराम भोसले,सुनीता भोसले, सुजाता भोसले, लता बनसोडे, मनीषा कचरे, सुरेखा मिलिंद भोसले, संदीप अवघडे, हणमंत अवघडे, मधुकर अवघडे, विष्णू चव्हाण गुरुजी, लखन खुस्पे, सरपंच चंद्रकांत वाघ, ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोसले, श्रीमंत भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.