स्थैर्य, मुंबई, दि. १३: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. त्यांचं संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी होते. समाजातून विषमता नष्ट व्हावी, समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी; प्रत्येकाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा, यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला. उपेक्षित बांधवांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश दिला. जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था त्यांनी देशाला दिली. स्वातंत्र्यानंतरची सत्तर वर्षे आपला देश अखंड, एकसंध, सार्वभौम राहिला, लोकशाही दिवसेंदिवस मजबूत होत गेली, याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना, दूरदृष्टीला आहे. डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानातच समस्त देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतिशील नेते होते. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना त्यांनी आत्मसन्मान, समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते कुशल राजकारणी होते. अभ्यासू समाजकारणी होते. महान अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कायदेतज्ञ होते. ते साहित्यिक होते. ध्येयवादी पत्रकार होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे महामानव होते. देशाचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, देशाची भौगोलिक, भाषावार प्रांतरचना, व्यापार, शेती, कामगारांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात रिकन्स्ट्रक्शन कौन्सिल सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेबांनी मोलाचे कार्य केले. स्वातंत्र्योत्तर काळात सिंचन व वीजप्रकल्पांसंदर्भातही मोठी जबाबदारी त्यांनी उचलली. दामोदर नदी खोरे, सोने नदी खोरे प्रकल्प, हिराकुड धरण प्रकल्पाचे काम त्यांच्या अखत्यारित झाले. रिझर्व्ह बँक, एलआयसीसारख्या संस्थांच्या स्थापनेतही त्यांचे मोलाच योगदान आहे. डॉ. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन रचनात्मक कार्याने भरलेले आणि भारलेले आहे. एकता, समता, बंधुता यासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच सर्वांना पुढे नेतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व कृतज्ञता व्यक्त केली आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचं, मानवतावादी शिकवणीचं पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण त्यांची जयंती 14 एप्रिल रोजी आपापल्या घरीच साजरी करुया. डॉ. बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करुया. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करुन डॉ. बाबासाहेबांच्या विचारांबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एकजूट दाखवून देऊया. असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.