दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२३ । सातारा । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना व बीज भांडवल योजना राबवण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी जिल्हा व्यवस्थापक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 22, अ, जुनी एम.आय.डी.सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलाजवळ सातारा येथील कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारांपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्ज फेड 36 ते 60 मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.
बीज भांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार 1 रुपये ते 7 लाख रुपयांपर्यंत आहे. मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रुपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात 5 टक्के अर्जदाराचा सहभाग, 45 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह) 50 टक्के बँकेचे कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे. या योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थीस एकच अर्ज दिला जाईल.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील गरजूंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून घेऊन जिल्हा कार्यालयात जमा करावा. जास्तीत जास्त लाभार्थींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. इंगळे यांनी केले आहे.