तांबवे येथे कोयना नदीत आढळले ग्रॅनाईट बॉम्ब


स्थैर्य, कराड, दि. १९: तालुक्यातील तांबवे गावानजीक असलेल्या कोयना नदीच्या पुलानजीक ग्रॅनाईट बॉम्ब सापडल्याने जिल्हा हादरला आहे. सोमवारी दुपारी मासेमारी करणाऱ्या काही युवकांच्या जाळ्यात हे बॉम्ब सापडले . घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकसह मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला.

कऱ्हाड तालुक्यातील सुमारे दहा किलोमीटर अंतरावर तांबवे गावानजीक कोयना नदीवर पूल आहे . या पुलानजीक सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काही युवक मासेमारी करीत होते . त्यावेळी त्या युवकांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. युवकांनी तातडीने याबाबतची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलीस तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. पथकाने प्राथमिक पाहणी केली असता ते ग्रॅनाईट बॉम्ब असल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबतची माहिती दहशतवादविरोधी पथकाला देण्यात आली. दुपारी तीनच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाकडून ग्रॅनाईटची तपासणी सुरू असून ते नदीपात्रात कोणी टाकले याचा शोध घेतला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!