
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : कांबळेश्वर (ता. फलटण) येथे शेतात काम करत असलेल्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेला आणि भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या तिच्या सुनेला, वृद्धेच्याच नातू आणि मोठ्या सुनेने लोखंडी टॉमी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नातू आणि मोठ्या सुनेविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध महिला दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या शेताच्या बांधाजवळ गवत काढत होत्या. यावेळी त्यांचा नातू जवळून ट्रॅक्टर घेऊन जात असताना, ‘ट्रॅक्टर एवढ्या जवळून का घेऊन जातोस,’ असे त्यांनी विचारले.
याचा राग आल्याने आरोपी नातवाने ट्रॅक्टरमधून उतरून लोखंडी टॉमीने आजीच्या डोक्याला आणि गालावर मारून तिला जखमी केले. त्याचवेळी आरोपीची आई (वृद्धेची मोठी सून) हिनेदेखील येऊन सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार पाहून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या वृद्धेच्या लहान सुनेलाही दोघांनी मारहाण करून जखमी केले.
या मारहाणीनंतर जखमी वृद्धेने आपल्या मुलासह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून, नातू आणि मोठ्या सुनेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल पवार करत आहेत.