
स्थैर्य, सातारा, दि.23 ऑक्टोबर : येथील मंगळवार पेठेत असणार्या आनंदाश्रममध्ये आजी -आजोबांनी दिवाळीचा आनंद खर्या अर्थाने लुटला. यावर्षीची दिवाळी घरगुती वातावरणात आनंदात साजरी करण्यात आली. आनंदाश्रमातील आजी-आजोबांनी आपल्या थरथरत्या हातांनी दिवाळीचा पहिला दिवा लावला आणि क्षणातच वृद्धाश्रमाचा सारा परिसर उजळून निघाला. केवळ प्रकाशाने नव्हे, तर ममतेच्या प्रकाशाने. त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. कोणीतरी अजूनही आपलं आहे याचा आनंद व्यक्त करीत आजी आजोबांनी उत्साहात दिवाळी सण साजरा केला.
आजी आजोबांच्या चेहर्यावरचे आनंदाचे हास्य हाच दिवाळीचा खरा प्रकाश होता. सुंदर रांगोळ्या काढून परिसर सजवला आणि दिवाळीचे वातावरण अधिक सुंदर केले. फटाके आणि फुलबाजे पेटवत वृद्धांनी दिवाळीचा आनंद लुटला.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी आनंदाश्रमाचे पदाधिकारी व कर्मचार्यांनी घरातील सदस्यांप्रमाणे आनंदाश्रमातील आजी आजोबांना तेल, उठणे लावून अंघोळी घालण्यात आली. दिपावली पर्वानिमित्त आजी आजोबांचा आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आली. बालपणातील जुन्या आठवणींना उजाळा देत काही आजी आजोबांनी एकत्र येऊन किल्ला बनविला होता.
आनंद आश्रमातील आजी आजोबा, कर्मचारी व संचालकतर्फे आठवडाभर दिवाळीची तयारी केली होती. काही जणांनी वेगवेगळे दिवाळीच्या फराळाचे पदार्थ केले होते. काही जणांनी आकाश कंदील बनविला. काही जणांनी आनंदाश्रमाची संपूर्ण स्वच्छता केली होती. दीपावलीची सांगताप्रसंगी सर्व संचालक, कर्मचारी व आजी-आजोबा एकत्र येऊन फराळ केला. यावेळी आजी आजोबांचे चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

