दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२३ | फलटण |
नीरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्या फलटण तालुक्यातील पाडेगावपासून राजुरीपर्यंतच्या सर्व गावांतील शेतकर्यांनी नीरा उजव्या कालव्याच्या सिमेंट काँक्रिटच्या अस्तरीकरणाच्या विरोधामधील लढ्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तडवळे, सुरवडी, डोंबाळवाडी, रावडी, मुरूम, कुसूर या गावातील नागरिक, शेतकरी संपूर्ण गाव बंद ठेवून माता-भगिनी, लहान, मुलांसह मंगळवार, दि. १८ जुलै रोजी आयोजित केेलेल्या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होणार आहेत. हा मोर्चा फलटणमध्ये जाऊन तेथे प्रांतांना निवेदन देण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये तडवळे पंचक्रोशीतील तडवळे, सूळवस्ती, डोंबाळवाडी, कुसूर, मिरेवाडी, पाडेगाव, तरडगाव, शिंदेमाळ, माळेवाडी, काळज या गावातील शेतकर्यांनी सकाळी ११.०० वाजेपर्यंत काळज या ठिकाणी एकत्र जमून पुढे घाडगेमळा, खराडेवाडी, पाच सर्कल या गावातील शेतकर्यांनी बडे खान या ठिकाणी या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी व्हायचं आहे. तसेच मुरूम, दोन्ही रावड्या, साखरवाडी, खामगाव, सुरवडी यांनी सुरवडी कमानीमध्ये येऊन काळजवरून येणार्या सर्व गावातील शेतकर्यांनी ट्रॅक्टर मोर्चातून सुरवडीतून सर्वांनी फलटणच्या दिशेने निघायचे आहे. पुढे निंभोरे, वडजल, भिलकटी, ताममाळ, होळ, फडतरवाडी, जिंती, खुंटे, चौधरवाडी येथील शेतकर्यांनी जिंती नाक्यावर ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होऊन क्रांतिसिंह नाना पाटील चौकात १२ वाजेपर्यंत पोहोचायचे आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौकात दुपारी १.०० वाजता आपल्या मोर्चाला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरूवात होईल. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चौकात महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चा महावीर पथ, पुढे डेक्कन चौक, त्यानंतर महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रांत कार्यालयाच्या दिशेने जाईल. त्या ठिकाणी श्रीमंत मालोजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून निवेदन देण्याचे ठरविले आहे. हा मोर्चा लोकशाहीच्या मार्गाने शांततेत सर्वांनी पार पाडायचा आहे. येथे नीरा उजव्या कालव्या अस्तरीकरणाच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात येणार आहेत, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी दिली आहे.
या मोर्चातील सर्व ट्रॅक्टर क्रांतिसिंह नाना पाटील चौकात मोर्चेकरांना सोडून रिंगरोड मार्गे विमानतळावर पार्किंगसाठी थांबणार आहेत. मोर्चा संपल्यानंतर मोर्चेकरी गिरवी नाक्यावर जाऊन त्या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये बसून मोर्चाची सांगता होणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.