
स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, फलटण तालुका महायुतीच्या वतीने आज, दि. १४ ऑगस्ट रोजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी, धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या सांस्कृतिक भवन येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
या रॅलीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.