स्थैर्य, फलटण दि. 24 : संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या तरडगाव मुक्कामानंतर सोहळा फलटणकडे रवाना होतो आजच्या दिवशी फलटण येथील विमानतळ परिसरातील पटांगणावर लाखो वारकरी विसावा घेतात मात्र करोनामुळे सोहळा स्थगित झाल्याने फलटणमध्ये प्रतिकात्मक समाज आरती करुन सोहळा साजरा करण्यात आला.
पालखी सोहळा स्थगीत करण्यात आल्याने अनेकवर्षाची पालखीची परंपरा खंडित झाली त्यामुळे भक्तजण नाराज असले तरी आजचा पालखी सोहळ्याचा फलटण मुक्काम गृहीत धरुन काही भाविकांनी सायंकाळी पालखी तळावर (विमानतळ) प्रतिकात्मक समाज आरती केली. ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करण्यात आला. ही समाज आरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करुन करण्यात आली. प्रसादाचे वाटप करण्यात आले. विराज खराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
त्यापूर्वी तांबमाळ येथे ह.भ.प. केशव महाराज जाधव, ह.भ.प. बबनराव निकम, ह.भ.प. दादासाहेब शेंडे, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, व्यवस्थापक नलवडे, भाजपा माढा लोकसभा प्रभारी पै. बजरंग गावडे यांच्यासह मोजक्या भक्त मंडळींच्या उपस्थितीत पंढरीच्या पांडुरंगासह संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमांचे पूजन व आरती करण्यात आली, काहीवेळ भजनादी कार्यक्रम झाल्यानंतर दूध संघाच्यावतीने उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले.