‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत भव्य आरोग्य शिबिर; न्यू हनुमान तरुण मंडळाच्या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निकोप हॉस्पिटलचे डॉ. जे. टी. पोळ यांनी शासकीय आरोग्य योजनांविषयी केले मार्गदर्शन


स्थैर्य, चौधरवाडी, दि. ०७ सप्टेंबर : श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या संकल्पनेअंतर्गत भांडवलकर वस्ती (शिवनगर) येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. न्यू हनुमान तरुण मंडळाच्या पुढाकाराने आणि निकोप हॉस्पिटल, फलटण यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

या आरोग्य शिबिराचा लाभ भांडवलकर वस्तीसह जिंती, चौधरवाडी (गारपीरवाडी), आणि शिंदेवाडी (पाटणेवाडी) येथील शेकडो नागरिकांनी घेतला. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपचार नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवासारख्या सणात असा विधायक उपक्रम राबवल्याबद्दल न्यू हनुमान तरुण मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी निकोप हॉस्पिटलचे प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जे. टी. पोळ यांनी शिबिरार्थींना विविध शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा समावेश होता. या योजनांचा लाभ कसा घ्यावा, यासाठीची पात्रता व प्रक्रिया याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

न्यू हनुमान तरुण मंडळाच्या अथक प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी झाले. याप्रसंगी विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!