स्थैर्य, नागठाणे, दि. १० : बोरगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह नागठाणे (ता.सातारा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामविकास अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत दमदाटी केल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मंगळवारपासून सातारा जिल्ह्यात सर्व ग्रामसेवक लेखणी बंद आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने एका निवेदनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सध्या सातारा जिल्ह्यात कोविड-१९ चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत.या संदर्भाने गावपातळीवरील ग्रामस्तरीय समिती प्रभावीपणे काम पहात आहे.समितीचे सचिव या नात्याने ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे आपल्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करत आहेत.
असे असतानाही नागठाणे येथील ग्रामविकास अधिकारी सचिन चंद्रकांत पवार हे सजात काम करत असताना व कंटेन्मेंट झोनची पाहणी करत असताना बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ,पोलीस कर्मचारी प्रशांत मोरे व अन्य सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी अर्वाच्च व गलिच्छ भाषेत दमदाटी केली आहे असे निदर्शनास येत आहे.सदरची घटना ही अतिशय निंदनीय व निषेधार्ह असून संबंधितांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी अन्यथा मंगळवार ११ ऑगस्टपासून जिल्हा लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे म्हटले आहे.या निवेदनाची परत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.