बंदिस्त बिलापोटी टक्केवारी घेतली : तिघांवर गुन्हा तर एकाला घेतले ताब्यात
स्थैर्य, सातारा, दि. 11 : पारगाव-खंडाळा येथे विहीरीचे काम करुन देण्यास मदत करणे व बंदिस्त गटाराच्या कामाचे डिपॉझिट परत मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या अभियंत्याने बिलापैकी 5 टक्के अशी 60 हजारांची लाच मागितली. ही लाच घेताना सातारा अँटिकरप्शनच्या ट्रॅपमध्ये या दोघांसह खाजगी ठेकेदार सापडले. जिल्हा परिषदेच्या गेटसमोर ही कारवाई झाली.
याबाबत माहिती अशी, ग्रामसेवक भाऊसाहेब गजानन सस्ते रा. खंडाळा याने तक्रारदारास मिळालेल्या विहीरीचे काम करुन देण्यास मदत करण्यासाठी व पारगाव खंडाळा येथील बंदिस्त गटार करण्याच्या केलेल्या कामाचे डिपॉझिट परत मिळवून देण्यासाठी या कामाच्या बिलाचे स्वतःसाठी 5 टक्के व शाखा अभियंता भोसले यांचेसाठी 5 टक्के असे एकुण 10 टक्के प्रमाणे 60 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. याबाबतची फिर्याद तक्रारदाराने केल्यानंतर दि.10 रोजी सापळा लावण्यात आला. ग्रामसेवक सस्ते व शाखा अभियंता भोसले यांनी मोबाईल फोनवरुन अंबादास रामराव जोळदापके रा. नांदेड सिटी, पुणे या खाजगी ठेकेदारास स्विकारण्यास संमती दिली. यानंतर सातारा येथे जिल्हा परिषदेच्या गेटजवळ जोळदापके याने लाचेचही रक्कम स्विकारताच त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक सस्ते यास अटक केली असून शाखा अभियंता भोसले मिळून आला नाही. याप्रकरणी सातारा शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
ही कारवाई अँटिकरप्शनचे (पुणे) पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहा.फौ.आनंदराव सपकाळ, हवालदार भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुखे, पो. ना. संजय अडसूळ, प्रशांत ताटे, श्रद्धा माने, पो. कॉ. संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, शीतल सपकाळ, चालक मारुती अडागळे यांनी केली आहे.