२० मार्चपूर्वी होणार झेडपी अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींची निवड! ग्रामविकास विभागाचे आदेश; फलटण पंचायत समितीत ‘टाय’मुळे सदस्यांवर नेत्यांचा कडक ‘वॉच’


राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० मार्चपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष व सभापती निवडीचे आदेश दिले आहेत. फलटण पंचायत समितीत ‘टाय’ची परिस्थिती असल्याने पुढील २०-२५ दिवस दोन्ही गटांनी आपल्या सदस्यांवर कडक नजर ठेवली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 26 फेब्रुवारी : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता पदाधिकारी निवडीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागाने नुकताच एक महत्त्वपूर्ण आदेश पारित केला असून, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार पार पडलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडी २० मार्च २०२६ पूर्वी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशानंतर फलटण पंचायत समितीच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडींना वेग आला असून, ‘टाय’ची परिस्थिती असल्याने दोन्ही गटांनी आपल्या सदस्यांवर कडक ‘वॉच’ ठेवला आहे.

ग्रामविकास विभागाचे आदेश काय?

दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकृत पत्र काढण्यात आले आहे. या आदेशानुसार सातारा जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ११(१) आणि ५९(१) मधील तरतुदींनुसार नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे प्रशासनाने ही पहिली बैठक २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित करून अध्यक्ष व सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

फलटण पंचायत समितीत वाढली धाकधूक; सदस्यांवर कडक ‘वॉच’

ग्रामविकास विभागाच्या या पत्रामुळे फलटण पंचायत समितीच्या राजकारणात मोठी धाकधूक वाढली आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘खासदार गट’ आणि विरोधी ‘राजे गट’ यांच्यात अटीतटीची लढत होऊन ‘टाय’ (समान संख्याबळ) परिस्थिती निर्माण झाली आहे.

सभापती निवडीला अजूनही २० ते २५ दिवसांचा मोठा कालावधी शिल्लक आहे. राजकारणात एवढा वेळ म्हणजे मोठी उलथापालथ होऊ शकते, याची जाणीव दोन्ही गटांच्या श्रेष्ठींना आहे. त्यामुळे या काळात आपला एकही सदस्य फुटू नये किंवा विरोधी गटाकडून कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी दोन्ही गटांना स्वतःच्या सदस्यांवर कडक ‘वॉच’ ठेवणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

मतमोजणी झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दोन्ही गटांनी याबाबत मोठी दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीचे दोन्ही गटांचे नवनिर्वाचित सदस्य हे आता आपापल्या गटाच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून थेट संपर्कात आणि देखरेखीखाली आहेत. यापुढील राजकीय घडामोडींवर नेत्यांचे अत्यंत बारीक लक्ष असणार आहे. त्यामुळे २० मार्चपूर्वी होणाऱ्या या ‘सभापती’ निवडीच्या पहिल्या बैठकीत फलटण पंचायत समितीवर नक्की कोणाचा झेंडा फडकणार, याचा फैसला होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!