ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर : हरवलेली वृद्ध महिला सापडण्यात यश


दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । फलटण । सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बरड गावामधील एक असामान्य घटना घडली. जालना जिल्ह्यातील वयोवृद्ध वारकरी महिला, गवळणाबाई मगर, पांच-सहा दिवस बरड गावात थांबून होती. ती अशक्त असल्यामुळे गावकऱ्यांनी तिच्यावर औषधोपचार देखील केले, परंतु अचानक ती महिला गायब झाल्याचे निदर्शनास आले. गावच्या पोलीस पाटील अश्विनी टेंबरे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबरवरून तात्काळ संपूर्ण गावाला ही माहिती कळवली, आणि त्यानंतर ग्रामस्थांनी वृद्ध महिलेची शोध सुरू केली. या प्रयत्नांमुळे हरवलेली वृद्ध महिला सापडण्यात बरड ग्रामस्थांना यश मिळाले.

सातारा जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील 1234 गावे सहभागी आहेत, ज्यामध्ये 9.11 लाख नागरिकांचा समावेश आहे. या यंत्रणेचा वापर आजवर जिल्ह्यात 12461 वेळा यशस्वी रित्या करण्यात आला आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबर 18002703600 / 9822112281 वापरून कोणत्याही संकट काळात नागरिकांना तात्काळ मदत मिळते. या यंत्रणेद्वारे घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे, गावातील कार्यक्रम/घटना विना विलंब नागरिकांना कळवणे, अफवांना आळा घालणे आणि प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे यासारखे अनेक फायदे आहेत.

या यंत्रणेचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे संपूर्ण स्वयंचलित असणे आणि गावासाठी सोप्या पद्धतीने सुरू करण्याची आणि सहभागी होण्याची सोय. या यंत्रणेतील सहभागी नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतात. संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो, ज्यामुळे दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता आणि ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे हरवलेली वृद्ध महिला शोधण्यात यश आले यामुळे नागरिकांच्या मदतीला येण्याची या यंत्रणेची क्षमता पुन्हा एकदा प्रकाशित झाली आहे. ही यंत्रणा नागरिकांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रभावी साधन ठरू शकते.


Back to top button
Don`t copy text!