
स्थैर्य, पिंपरद, दि. ३० ऑक्टोबर : येथील ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ आणि प्रभावी वापरामुळे सुमारे २० एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचला. येथील शेतकरी चंद्रकांत माने यांच्या उसाला बुधवारी (दि. २९) सकाळी पावणेबारा वाजता आग लागली होती.
आग लागल्याचे समजताच, गावचे पोलीस पाटील सुनील बोराटे यांनी तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन क्रमांकावर (१८००२७०३६००) संपर्क साधून संपूर्ण गावाला माहिती दिली. हा संदेश एकाच वेळी सर्व गावकऱ्यांना मिळाल्याने, काही वेळातच गावकरी आणि अग्निशामक दल मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला व सुमारे २० एकर ऊस वाचला.
पिंपरद ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व अधिकारी यांच्या प्रयत्नांतून गावात ही यंत्रणा प्रभावीपणे राबवली जात आहे. आजवर गावात विविध सूचना देण्यासाठी २३ वेळा या यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद यांचा हा संयुक्त उपक्रम असून, जिल्ह्यातील १२२९ गावे व ९.३८ लाखांहून अधिक नागरिक या यंत्रणेत सहभागी आहेत.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					