
दैनिक स्थैर्य | दि. 29 मार्च 2025 | सातारा | फलटण पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असणारे ग्रामसेवक संतोष उत्तम धायगुडे यांनी ग्रामपंचायत मुरूम येथे कार्यरत असताना विविध गैरप्रकार केल्या प्रकरणी त्यांचे निलंबन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी केले आहे.
याबाबत निलंबन आदेशात असलेली माहिती अशी की, संतोष उत्तम धायगुडे हे ग्रामसेवक ग्रामपंचायत मुरुम येथे कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायत कामकाजामध्ये प्रशासकीय व आर्थिक अनियमितता केलेली निदर्शनास आलेली आहे. धायगुडे यांनी ग्रामपंचायत अभिलेखे अपुर्ण ठेवून आर्थिक व दप्तरी कामकाजात अनिमियतता केलेली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करुन मतदार यादीतील खोटया सह्या करुन नावे कमी करणेचा गैरप्रकार केलेला आहे.
धायगुडे यांनी लेखा परिक्षणास दप्तर न दाखविले संदर्भात त्यांना दंडाचे कारवाईबाबत दिनांक 21.11.2023 अन्यये कारणे दाखवा नोटीसही देणेत आलेली आहे. या सर्व बाबींमध्ये धायगुडे यांनी कर्तव्यात कसुर केलेली असून, महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केला आहे. तसेच त्यांनी आर्थिक व प्रशासकीय अनियमितता केलेचे व त्यामुळे मुरुम ग्रामपंचायतींचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सबब धायगुडे यांचेवरील चौकशी पूर्ण करणेसाठी व चौकशीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये याकरिता संतोष संतोष उत्तम धायगुडे, ग्रामसेवक यांना पदावरुन तात्पुरते दुर करणे आवश्यक वाटते, असे सुद्धा निलंबन आदेशात स्पष्ट केले आहे.