दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली/फेस रिडिंग प्रणाली यासारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचार्यांची हजेरी नोंदविली जाते. ग्रामसेवकांच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागाच्या जवळ आहेत, अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रीक हजेरी राबविण्यात येते.
अतिदुर्गम, डोंगराळ भागात नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येऊ शकतात. तथापि, सद्य:स्थितीत बहुतांश भागामध्ये नेटवर्क कनेक्टिविटी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागालगत आहेत, किंवा ज्या-ज्या ठिकाणी नेटवर्क कनेक्टिविटी उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमॅट्रिक / जीपीएस हजेरी प्रक्रिया राबविणे शक्य आहे. त्यामुळे ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी यांची बायोमॅट्रिक / जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश शासनाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी काढले आहेत.