दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । फलटण । गेल्या काही वर्षांपासून स्टील, सिमेंट व इतर बांधकाम साहित्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही वर्षाच्या तुलनेत आता हे दर गगनाला भिडले असून परिणामी, घरांच्या किमतीत होणारी वाढ टाळण्यासाठी शासनाने यासंबंधी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी क्रेडाई फलटणचे अध्यक्ष जावेदभाई तांबोळी व सेक्रेटरी युवराज निकम यांनी केली आहे.
फलटण हा अवर्षण प्रवण क्षेत्रातील तालुका त्यामुळे वेळेवर समाधानकारक पाऊस नाही, प्रतिकुल हवामानामुळे शेती बिनभरवशाची, उद्योग धंदे नाहीत त्यामुळे बेकरांची संख्या मोठी त्यापार्श्वभूमीवर आता नीरा – देवघर व धोम – बलकवडी या दोन धरणांचे पाणी पोहोचल्याने पूर्वी भाटघर व वीर धरणांच्या पाण्यावर भिजणाऱ्या ३५ गावांच्या संख्येत वाढ झाली आहे, आगामी काळात संपूर्ण तालुका बागायत होणार आहे, औद्योगिक वसाहतीमध्ये कमिन्सचे अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत, तालुक्यात ४ साखर कारखाने मोठ्या क्षमतेने ऊस गाळप करीत आहेत, २ राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असून रेल्वे सुरु झाली आहे लवकरच फलटण – पुणे – मुंबई मार्गावर रेल्वे धावणार आहे, फलटण – पंढरपूर मार्गावर रेल्वे प्रस्तावित आहे या पार्श्वभूमीवर फलटण व परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत असताना घरांच्या किमती किंवा बांधकाम साहित्याच्या किमतीमधील वाढ फलटण करांच्या प्रगतीला खीळ घालणारी ठरु नये यासाठी आम्ही या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती शासनाला करतो आहोत , लोकप्रतिनिधींनीही हा विषय शासन स्तरावर लावून धरावा अशी अपेक्षा क्रेडाई फलटणचे अध्यक्ष जावेदभाई तांबोळी व सेक्रेटरी युवराज निकम यांनी व्यक्त केली आहे.
आकडेवारीनुसार, बांधकाम साहित्याच्या किंमत वाढीबाबत तपशीलवार माहिती द्यावयाची झाल्यास, बांधकाम साहित्यापैकी महत्वाचा घटक असणाऱ्या स्टीलचा दर वर्षभरापूर्वी (प्रती टन) ४२,००० रुपये होता आता जवळपास ८४,९०० रुपये इतका झाला आहे. सिमेंटचा (प्रती बॅग) दर २६० रुपयांवरुन आता ४०० रुपयांच्या घरात गेला आहे. ४ इंच विटांचा दर प्रती हजार ६,५०० रुपये इतका होता तो आता ८,००० रुपये झाला आहे. वाळू आणि वॉश सॅण्ड यामध्ये ही अशीच मोठी वाढ दिसून येत आहे. वाळूचा दर (प्रति ब्रास) मागे ६,००० रुपये होता तो आता ७,५०० एवढा झाला आहे. तर वॉश सॅण्डचे दर सुद्धा (प्रती ब्रास) ३,८०० रुपयांवरुन ४,८०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. बांधकाम साहित्याबरोबरच इलेक्ट्रिक वायर, फिटिंग्स, टाईल्स, पाईप, सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन, रेती, गौण खनिज, मुरुम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मजुरी यात देखील साधारणतः ४० टक्के वाढ झाली असल्याचे क्रेडाई फलटणचे अध्यक्ष जावेदभाई तांबोळी व सेक्रेटरी युवराज निकम यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मंदी सदृश्य अवस्थेत असलेल्या बांधकाम क्षेत्रास करोनामुळे लागलेल्या लॉक डाऊनचा देखील चांगलाच फटका बसला असून त्यातच भरीस भर म्हणजे रशिया, युक्रेनच्या युद्धाचाही अप्रत्यक्ष परिणाम बांधकाम क्षेत्रावर होऊ लागला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली ही वाढ नैसर्गिक आहे की, साठेबाजीमुळे किंवा नफेखोरीमुळे होत आहे, याची देखील प्रशासनाने व सरकारी यंत्रणांनी पडताळणी करावी. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सामान्य गृह खरेदीदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी यापूर्वीच क्रेडाई राज्य शाखेने पत्रकाद्वारे केली असल्याचे क्रेडाई फलटणचे अध्यक्ष जावेदभाई तांबोळी व सेक्रेटरी युवराज निकम यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
बांधकाम साहित्याचे दर असेच सातत्याने वाढत राहिल्यास नजीकच्या काळात घरांच्या किंमतीत किमान ४५० ते ५०० रुपयापर्यंतची वाढ होणे अटळ असल्याचे असल्याचे क्रेडाई फलटणच्या पदाधिकारी सदस्यांचे मत आहे.