
दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२४ | फलटण |
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सरकारने पुढाकार घेऊन त्वरित सोडवण्यासाठी अखंड मराठा समाजाच्या वतीने मराठी क्रांती मोर्चा फलटण यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गरजवंत मराठ्यांच्या ५०% च्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या एक वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. आतापर्यंत जरांगे पाटलांनी सहावेळा आमरण उपोषण केले आहे. आता सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आपण अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता सरकारने स्वतः पुढाकार घेऊन खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
१) सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
२) हैदराबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे. बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे.
३) संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
४ ) कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे.
५) शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम गतीने सुरु करावे.
६) ईडब्ल्यूएससह एसईबीसी किंवा कुणबी ओबीसी हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा.
७ ) मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा.
यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार म्हणून पुढाकार घ्यावा आणि विशेष अधिवेशन बोलावून जरांगे-पाटलांच्या मागण्या मान्य कराव्यात. विशेष अधिवेशन लाईव्ह करण्यात यावे, जेणेकरून विरोधी पक्षांची भूमिका अखंड मराठा समाजाला कळेल आणि मराठा आरक्षणाच्या विषयाचे राजकारण कोण करत आहे, हे महाराष्ट्राला कळेल, अशा मागण्या केल्या आहेत.
अखंड मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षण देऊन आपण हा प्रश्न कायमस्वरूपीचा निकालात काढावा. अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोको, रेल्वे रोको, सत्तेतल्या आणि विरोधी पक्षातील सरसकट नेत्यांना गाव बंदी, नेत्यांना घेराव, शासकीय कार्यालयातील काम बंद आंदोलन, मराठा समाजातील मुले शाळा, कॉलेज वरती बहिष्कार टाकतील, तसेच मंगलयावर घंटा नाद पायी यात्रा काढण्यात येणार व जोपर्यंत आरक्षणाची दखल घेण्यात येत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव आणि कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी दिला आहे.
या निवेदनावर अखंड मराठा समाज, फलटण तालुका, फलटणचे नारायण नलवडे, अमोल सस्ते, गोकुळ घोरपडे, ज्ञानेश्वर सावंत, प्रविण दिथे, किरण भोसले आदींच्या सह्या आहेत.