दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । फलटण । महापुरुषांच्या जन्मगावातील शाळांचा विकास करण्यासाठी अर्थ व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात 10 शाळांसाठी प्रत्येकी रु. 1 कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. हे निश्चितच अभिनंदनीय आहे. परंतु त्यामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असलेल्या पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व 102 वर्षांपासून महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील लाखो विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून शिक्षण देणार्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मगाव असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील शाळेचाही तातडीने समावेश पहिल्या टप्प्यातील 10 शाळांबरोबरच करावा अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टी व प्रसारमाध्यमांशी नेहमीच संवादी भूमिका असलेले व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राज्यातील महाविकास आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, खा.शरद पवार यांनीही याबाबत लक्ष घालावे, असे आवाहनही रविंद्र बेडकिहाळ यांनी केले असून त्यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
याबाबत अधिक भूमिका स्पष्ट करताना रविंद्र बेडकिहाळ यांनी नमूद केले आहे की, शासनाच्या या निर्णयात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महर्षी धोंडो कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील या 10 महापुरुषांच्या जन्मगावाची निवड योग्यच आहे. या सर्वांनी महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची दिशा दिली आहे. तथापि या सर्वांच्या आधी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकशिक्षणाची जागृती म्हणून पहिल्या मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ ची सुरुवात 6 जानेवारी 1832 पासून व पहिल्या मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ची सुरुवात 1 मे 1840 पासून केली. मुंबईतल्या पहिल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्रोफेसर, तत्कालीन पहिले शिलालेख संशोधक व मुंबई इल्याख्यातील शाळा तपासनीस, ब्रिटीशांच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे पहिले भारतीय सचिव, ग्रंथ समीक्षक, धार्मिक सुधारणावादी असे बाळशास्त्री होते. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील बहुजन व गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी सध्याच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. म्हणून या दोन्ही महापुरुषांच्या जन्मगावी असलेल्या शाळांचा या योजनेमध्ये राज्यशासनाच्या अर्थसंकल्पात पुरवणी मागणी म्हणून समावेश करणे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाच्या दृष्टीने अत्यंत उचित निर्णय ठरेल. पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सादीक डोंगरकर व देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.