सातारा येथे स्थापित होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या साधनसामुग्रीसाठी शासनाकडून निधी मंजूर – पालकमंत्री बाळासाहेब पाटील


स्थैर्य, सातारा, दि.२१: सातारा येथे नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता संगणक व इतर खरेदी करण्यास आणि आयुर्विज्ञान आयोगाकडून होणाऱ्या निरिक्षणाकरिता यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्यास राज्य योजनेंतर्गत निधी उपलब्धतेसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

सातारा येथे नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता संगणक व इतर खरेदीसासाठी 38 लाख 10 हजार इतक्या रक्कमेस 18 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

तसेच महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निरिक्षणाकरीता त्यांच्या मानकानुसार शरीररचनाशास्त्र, शरिरक्रियाशास्त्र व जीवरसायनशास्त्र या विभागांकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीसाठी सातारा, सिंधुदुर्ग व अलिबाग येथील नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना 8 कोटी 95 लाख 61 हजार 394 इतक्या रक्कमेस 18 मे च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, असेही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!