
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : फलटणमधील युवा क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘गोविंद चषक’ T/20 अंडर-20 क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन आणि गोविंद मिल्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचा शुभारंभ १८ ऑक्टोबर रोजी होणार असून, स्पर्धेचे वेळापत्रक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करून सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. फलटणच्या क्रीडा परंपरेत या स्पर्धेने मोलाची भर घातली असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या स्पर्धेच्या आयोजनात अशोक गाडगीळ, दशरथराव नाईक निंबाळकर, अवि कांबळे आणि मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य बाबासाहेब गंगावणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा यशस्वी होत असून, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मुख्य उद्देश आहे.
ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणार असून, यामध्ये एकूण ९ नामांकित संघ सहभागी होणार आहेत. फलटणसह पुणे, सातारा आणि माळशिरस येथील प्रमुख संघ या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवतील. अंडर-20 वयोगटातील खेळाडूंसाठी मर्यादित षटकांची ही स्पर्धा एक उत्तम संधी मानली जात आहे. सर्व सामने लेदर बॉलने खेळवले जाणार असल्याने खेळाडूंच्या कौशल्याचा खरा कस लागणार आहे.
स्पर्धेतील सर्व सामने चुरशीचे होतील, अशी अपेक्षा असून स्पर्धेचा अंतिम सामना २८ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. फलटण आणि परिसरातील क्रीडाप्रेमींनी या उच्च दर्जाच्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
स्थानिक पातळीवर अशा मोठ्या स्पर्धांचे आयोजन झाल्यामुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. गोविंद चषक स्पर्धेमुळे फलटणमधील क्रिकेटच्या विकासाला निश्चितपणे चालना मिळेल, असा विश्वास क्रीडा वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.