दैनिक स्थैर्य | दि. 28 जानेवारी 2025 | फलटण | पुण्यात आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ च्या विशेष संवाद सत्रात, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि., मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्स या कंपन्यांनी मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी शोधल्या. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि डॉ. जयसिंह मारवाह यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सोबत झाली.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि., मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्स या कंपन्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याशी गुंतवणुकीच्या संधी आणि विस्ताराच्या संधी याबाबत विस्तृत चर्चा केली. ही बैठक पुणे येथे आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ च्या विशेष संवाद सत्रात झाली, जिथे दोन्ही पक्षांनी राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये संभाव्य गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली.
मध्य प्रदेश देशात सुमारे ९ ते १०% दूध उत्पादन करताना ३ ऱ्या क्रमांकावर आहे, यामुळे दुग्ध उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाल्या आहेत. मध्यप्रदेश राज्य सरकार शेतकऱ्यांना पशु पालन व दुग्ध उत्पादनाच्या सोयी उपलब्ध करुन देत आहे, ज्यामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रचंड विस्ताराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
रसायन, औषध निर्माण, पेट्रोकेमिकल्स आणि प्लास्टिकसारख्या क्षेत्रांसाठी मध्य प्रदेशात उत्कृष्ट उद्योग पर्यावरण आहे. मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्स यासारख्या विशेष रसायन उत्पादन युनिट्सच्या विस्तारासाठी मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत, हे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
IIEBM च्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २५-३०% विद्यार्थी दरवर्षी मध्य प्रदेशातून पुण्यात पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षणासाठी येतात, ही बाबही उल्लेखनीय असल्याचे डॉ. जयसिंह मारवाह यांनी आवर्जून सांगितले. गोविंद मिल्कच्या माध्यमातून व्यवसाय आणि समाजाच्या विकास आणि समृद्धीस चालना देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे, असा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
CII पुणे ऑफिसचे उपसंचालक व प्रमुख प्रसाद बच्छाव, उपसंचालक विशाल लाल आणि कार्यकारी खुशाल बोरघरे यांचे विशेष आभार यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.