दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२४ | फलटण | उद्या 31 डिसेंबर रोजी, मंगळवारी रात्री, फलटण शहरात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात येत आहे, ज्यामध्ये गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., निकोप हॉस्पिटल, फलटण डॉक्टर असोसिएशन, फलटण नगरपरिषद आणि फलटण शहर पोलीस स्टेशन यांचा संयुक्त सहभाग असेल.
या उपक्रमाचे मुख्य घोषवाक्य “सुंदर फलटण, निरोगी फलटण, सुरक्षित फलटण” असेल. या माध्यमातून समाजाला शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सायंकाळी पाच ते सहा या वेळेत चार वेगवेगळ्या ठिकाणी गोविंद मिल्कच्या वतीने दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.
नाना पाटील चौक (सायं. ५.०० ते ५.१५), आंबेडकर चौक (सायं. ५.१५ ते ५.३०), डी. एड, चौक (सायं. ५.३० ते ५.४५), महात्मा फुले चौक (सायं. ५.४५ ते ६.००) या ठिकाणी दुधाचे वाटप करून तरुण पिढीला आरोग्यासाठी दुधाचा आहार किती आवश्यक आणि उत्तम आहे याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यावेळी निकोप हॉस्पिटलचे डॉक्टर जे. टी. पोळ युवकांना मार्गदर्शन करून व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर काय होतात याबाबत माहिती देणार आहेत.
फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधिकारी यशवंत नलावडे हे मार्गदर्शन करून व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला युवकांना देणार आहेत. 31 डिसेंबरच्या रात्रीच्या वेळी शहरातील नागरिकांना शांतता भंग होऊन कोणताही त्रास होऊ नये, काही अपघात होऊ नये, आणि कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यशवंत नलावडे पोलीस अधिकारी फलटण शहर पोलीस स्टेशन यांनी प्रतिपादन केले आहे की, हा सामाजिक उपक्रम फलटण शहरामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखावी आणि कोणत्याही प्रकारचे दंगा गडबड गोंधळ न करता सर्व नागरिकांना येणाऱ्या नवीन वर्षाचा आनंद घेता यावा यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
फलटण शहरातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि तरुण पिढीला आपल्या आरोग्यासाठी काय आवश्यक आहे आणि व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर काय होतात याबाबत माहिती मिळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.