गोविंदमहाराज उपळेकरांचा ५२ वा समाधी सोहळा; फलटणमध्ये ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात

प. पू. श्री गोविंदमहाराज उपळेकर यांच्या ५२ व्या समाधी सोहळ्यानिमित्त फलटणमध्ये ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी याची सांगता होणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 27 सप्टेंबर : प. पू. श्री गोविंदमहाराज उपळेकर यांच्या ५२ व्या समाधी सोहळ्यानिमित्त समाधी मंदिर संस्था, लक्ष्मीनगर येथे ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या’स भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या सप्ताहाची सांगता ३ ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि महाप्रसादाने होणार आहे.

विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचन

या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी साडेआठ ते साडेअकरा या वेळेत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण होत आहे. दुपारी हरिभजन आणि सायंकाळी विविध मान्यवरांची प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये मुक्ता गरसोळे-कुलकर्णी, पराग देशमुख, श्रीकांत महाराज पाटणकर, पुष्पाताई कदम, चिन्मय महाराज पुजारी आणि सुरेश महाराज सूळ यांचे मार्गदर्शन भाविकांना लाभणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून पुष्पाताई कदम आणि निर्मलाताई काकडे काम पाहत आहेत.

३ ऑक्टोबरला महाप्रसाद आणि सांगता

शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी मुख्य समाधी उत्सवाच्या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून काकडा आरती, लघुरुद्र, गीता पठण आणि पसायदानाने पारायणाची सांगता होईल. दुपारी साडेबारा वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता कमलाकर महाराज भादोले यांचे कीर्तन होईल. सायंकाळी फुलांचा कार्यक्रम, पालखी सोहळा आणि नगर प्रदक्षिणेने उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि विश्वस्तांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!