फलटणमध्ये ‘गोविंद चषक’ टी-२० क्रिकेटचा थरार; १८ ऑक्टोबरपासून सामन्यांना सुरुवात


स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : फलटण एज्युकेशन सोसायटी आणि क्रिकेट ॲकॅडमी ऑफ चॅम्पियन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २० वर्षांखालील मुलांसाठी ‘गोविंद चषक’ या भव्य लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक १८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, फलटण येथे होणार आहे.

या स्पर्धेत २० वर्षांखालील (जन्म दिनांक ०१-०९-२००५ नंतर) खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. दिवस-रात्र चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला किमान तीन साखळी सामने खेळायला मिळणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला ३१,००० रुपये रोख आणि आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला २१,००० रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त स्पर्धेत मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर असे वैयक्तिक पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांना १२,००० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीचे अशोक गाडगीळ, दशरथ नाईक निंबाळकर, बाबासाहेब सणस, अवि कांबळे आणि प्रवीण जाधव हे परिश्रम घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!