राज्यपालांचे वाहनचालक मोहन मोरे सेवानिवृत्त; राज्यपाल कोश्यारींकडून भावपूर्ण सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । राज्यपालांचे वाहनचालक असलेले मोहन मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे हृद्य सत्कार केला.

३१ जानेवारी रोजी निवृत्त झालेल्या मोहन मोरे यांना राज्यपालांनी सहकुटुंब आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. एका छोटेखानी निरोप समारंभात राज्यपालांनी मोरे यांच्या उत्कृष्ट कामाचा गौरव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. गेली तीन वर्षे मोरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते.

यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी व सहकाऱ्यांनी आपल्या समयोचित भाषणांमधून मोहन मोरे यांच्या कार्याचा तसेच मनमिळावू स्वभाव तसेच आठवणींना उजाळा दिला.

राष्ट्रपती व पंतप्रधानांचेदेखील केले सारथ्य

मूळचे दुधगाव, महाबळेश्वर येथील असलेले मोहन मोरे तब्बल ४० वर्षांच्या राजभवनातील शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मोहन मोरे जानेवारी १९८३ मध्ये शासकीय सेवेत क्लिनर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी १९८७ पासून वाहनचालक म्हणून काम केले.

आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर, मोहम्मद फजल, एस एम कृष्णा, एस सी जमीर यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या वाहनाचे सारथ्य केले.

देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंह तसेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद राजभवन येथे आले असताना त्यांच्या वाहनाचेदेखील श्री. मोरे यांनी सारथ्य केले होते.


Back to top button
Don`t copy text!