दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । मुंबई । ठाणे येथील नागरी समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर आयोजित ‘जेन-नेक्स्ट ठाणे पॉवरपॉईंट सादरीकरण’ स्पर्धेतील विजेत्या २० विद्यार्थ्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (बुधवारी) राजभवन येथे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे, सुजय पत्की, सचिन मोरे व ठाणे येथील शाळांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी नगरी समस्या सोडवणुकीसाठी संकल्पना मांडल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांनी मोठे होऊन राज्यासाठी व देशासाठी काम करावे असे राज्यपालांनी सांगितले.
‘ठाणे शहरातील विविध नागरी समस्या व उपाय’ या विषयांवर खासदार डॉ विनय सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने १३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पॉवर पॉईंट सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत ७० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य, नवीन तंत्रज्ञान या विषयांवर आपल्या संकल्पना सादर करण्यास सांगण्यात आले होते. या स्पर्धेतील निवडक विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.