स्थैर्य, मुंबई, दि.१२: अभिनेत्री कंगना रणावतच्या कार्यालयावर पालिकेकडून कारवाई झाली असेल, तर मग तिने केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन आहे का?, असा सवाल शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी विचारला.
अॅड. परब म्हणाले, “सध्या रामदास आठवले यांच्याकडे कुणी पाहत नाही, प्रकाशझोतात येण्यासाठी आठवले याप्रकरणी बोलत आहेत. कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला हात लावू नये, असे ज्यांना वाटते त्यांनी खुलेपणाने सांगावे. पालिकेच्या कारवाईवर नाराजी प्रकट करणाऱ्यांचे रिपाइं, भाजप व राजभवन यांचे बेकायदा बांधकांमांना अभय आहे का?, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, परब यांच्या वांद्रे येथील कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. “कंगनाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली हे बरे आहे. कंगनाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. म्हणून वाद वाढला. अंगावर आले त्याला शिंगावर घ्यायचे अशी शिवसेनेची खासियत असल्याचे परब यावेळी म्हणाले.
परब यांचे कार्यालय अनधिकृत: परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयास अवैध बांधकाम प्रकरणी म्हाडाने एक वर्षापूर्वी नोटीस पाठवली होती. ते अनधिकृत कार्यालय अजून का तोडण्यात आले नाही? शिवसेनेचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे असतात काय? असा सवाल भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी केला आहे.
कंगना प्रकरणाशी माझे देणे-घेणे नाही : राज्यपाल
कंगना रणावतप्रकरणी मी नाराज नसून त्या प्रकरणाशी माझे देणेघेणे नाही, असा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कंगना विरुद्ध शिवसेना यांच्यात सामना रंगला आहे. यावर राज्यपाल कोश्यारी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कॉफीटेबल बुकचे शनिवारी प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.