अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । मुंबई ।  ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात, तसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्त्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था गोपालन व गोरक्षणाचे कार्य अहिमहिकेने करीत आहेत. अशावेळी पंचगव्यासह विविध गौउत्पादनांचा अधिकाधिक वापर करून गायीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना द्यावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

दिंडोशीनगर, गोरेगाव मुंबई येथे प्रथमच आयोजित केलेल्या एक आठवड्याच्या ‘गऊ ग्राम महोत्सवा’चे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 12) झाले, त्यावेळी ते बोलत होते.

महोत्सवाचे आयोजन ‘गऊ भारत भारती’ या गायीच्या संवर्धनाला समर्पित वृत्तपत्राच्या वतीने करण्यात आले.

रासायनिक खतांऐवजी गायीचे शेण तसेच गोमूत्र यांचा वापर करून एक एकर पर्यंत शेती करण्याचा प्रयोग देशात यशस्वीरीत्या झाला असल्याचे नमूद करून लोकांनी गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी तसेच गौ आधारित उत्पादने वापरावीत, असे आवाहन राज्यपालांनी केले.

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून गाय महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

गायीपासून मिळणारी केवळ दोन-चार उत्पादनेच अधिकांश लोकांना माहिती आहेत असे सांगून गौउत्पादनांची मागणी निर्माण करून गो-पालक व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ‘गऊ भारत भारती’चे संपादक तसेच महोत्सवाचे निमंत्रक पत्रकार संजय ‘अमान’ यांनी यावेळी सांगितले.

युवती व लहान मुलींनी यावेळी श्रीकृष्ण लीलांवर आधारित नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते गोसेवा कार्यास योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला महेंद्र काबरा, संतोष शहाणे, राम कुमार पाल, संजय बलोदी ‘प्रखर’, हरीश बोरा, आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!