स्थैर्य. कणकवली, दि.४: रिपब्लिक
वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची अटक ही सूड भावनेतून केल्याचा
आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे सरकारने चालवलेल्या या नव्या उद्योगाचा मी निषेध करतो, असे ते
म्हणाले.
सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन राणे
यांनी अर्णबची पाठराखण केली. अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात रायगडमध्ये
२०१८ साली गुन्हा दाखल झाला होता. एका व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त
केल्याप्रकरणी अर्णबवर गुन्हा दाखल होता. ही केस आता क्लोज झाली आहे.
त्यामुळे सुडाने आणि आकसाने उद्धव ठाकरे सरकारने जे उद्योग सुरू केलेत,
त्यातील हा नवा उद्योग असून मी त्याचा निषेध करतो, असे नारायण राणे
म्हणाले.
अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना,
त्यांच्या मुलाला जी वागणूक पोलिसांनी दिली त्याचा मी निषेध करतो. अशी
कारवाई मुंबई पोलिसांची आणि रायगड पोलिसांनी अतिरेक्यांविरुद्ध, ड्रग्ज
सप्लाय करणा-यांविरुद्ध आणि बलात्कार करून खून करणाºयांविरुद्ध केली नाही.
सुशांतची केस, दिशाची केस, रियाची केस नजीकच्या आहेत. तिथे पोलिसांनी
केलेला पराक्रम जनतेला माहिती आहे. तेव्हा एका संपादकाविरोधात जुन्या
खटल्याचा संदर्भ देऊन पाचशे पोलीस घेऊन जाऊन अटक करावी, याला धाडस म्हणता
येईल का? मुंबईत अतिरेकी असतील, ड्रग्ज पुरवठा करणारे असतील, लहान मुलांना
पळवून नेऊन व्यापार करणारे असतील, बलात्कार करून खून करणारे असतील,
त्यांच्या विरुद्ध या पोलिसांकडून आतापर्यंत का कारवाई झाली नाही. या
सरकारच्या प्रमुखांना कायद्याची जाण नाही. कायद्याची अंमलबजावणी कशी करावी,
हे यांना माहिती नाही, असे राणे म्हणाले.
सरकार चालवायला ही मंडळी असमर्थ ठरलेली
आहेत. मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. नेहमी शिवाजी महाराजांचे नाव
सांगून सरकार चालवणारे त्यांचा कारभार, ही कारवाई पाहता त्यांनी
महाराजांचे नाव घेणे बंद करावे, असे राणे म्हणाले. अर्णब गोस्वामी
यांच्यावर कारवाई झाल्यानंतर प्रसार माध्यमांचे प्रमुख गप्प आहेत. नेहमीच
पत्रकारांवर अन्याय होतोय म्हणून गळा काढणारे आता गप्प का, असा प्रश्नही
राणेंनी यावेळी उपस्थित केला.