दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । औरंगाबाद । औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिलेले आहे. संत एकनाथ रंग मंदिराच्या वास्तूच्या नूतनीकरण आणि लोकार्पणामुळे औरंगाबादच्या सांस्कृतिक विकासामध्ये अधिक भर पडण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
संत एकनाथ रंग मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे श्री.ठाकरे बोलत होते. या संत एकनाथ रंग मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमास उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर, राजेंद्र जंजाळ, राजू शिंदे, अंकिता विधाते आदींची उपस्थिती होती.
कोविडच्या बंद काळाचा चांगल्याप्रकारे उपयोग करून संत एकनाथ रंग मंदिराचे नूतनीकरण केल्याबद्दल प्रशासनाच्या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. शहराच्या विकासासाठी मुलभूत सोयीसुविधा देताना सिनेमागृहे, उद्याने, नाट्यगृहे यांच्याकडे दुर्लक्ष होते. परंतु सिनेमागृहे, उद्याने, नाट्यगृहे यांची जीवनात आवश्यकता असतेच. शहरातील संत एकनाथ रंग मंदिरातून संत एकनाथ महाराजांनी दिलेला संदेश कलेच्या माध्यमातून सर्वदूर पोहचण्यासाठी मदत होणार आहे. या सेवेचे लोकार्पण झाल्याचा आनंद आहे. या सेवेबरोबरच शहरासाठी महत्त्वाचे असलेले गुंठेवारी, नवीन पाणीपुरवठा योजना, पैठण येथे संतपीठ आदीप्रकारचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत. त्याचबरोबर पैठण येथे सुंदर अशा प्रकारचे उद्यानही शासन करत आहे. विधान मंडळाने औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करून केंद्र शासनाला पाठविलेला आहे. केंद्र शासनही त्यास मान्यता देईल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री देसाई यांनी औरंगाबादच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. कोविड काळात जगभरातील आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली होती. तशीच औरंगाबादलाही या संकटाला तोंड देताना कठीण काळातून जावे लागले. परंतु सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने पुढे जात आहे. 152 कोटी रूपयांचे रस्ते शहरात झाले आहेत. घनकचऱ्याचे संपूर्ण व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने होते आहे. क्रांती चौकात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लवकरच विराजमान होत आहे. खाम नदीचे पुनरूज्जीवन झाले आहे. गुंठेवारीचा ऐतिहासिक असा निर्णय शासनाने घेतल्याने शहरातील दोन लाख घरांना शासनाच्या निर्णयाचा लाभ होतो आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासात अधिक भर घालण्यासाठी मेट्रो रेल्वेचा डीपीआर तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे अत्याधुनिक सोयीसुविधांनी औरंगाबाद जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे श्री. देसाई म्हणाले.
शिवाय, संत एकनाथ रंग मंदिर ज्याप्रमाणे सर्व सोयींयुक्त जनतेच्या सेवेत देण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे संत तुकाराम नाट्यगृहाचेही नूतनीकरणाचे काम लवकरच करण्यात येऊन त्याचेही लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.देसाई यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री.देसाई यांच्याहस्ते फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून संत एकनाथ रंग मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पांडेय यांनी केले. यामध्ये त्यांनी शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रम कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.