दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । पुणे । छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी येऊन दर्शन घेणे रोमांचक अनुभव आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आज घराघरात शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकीक कार्याची आठवण प्रत्येकाच्या मनात सतत रहाते. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करतो. त्यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्वसामान्य, गोरगरीब आदी सर्व घटकांसाठी काम करीत आहे.
शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान
महाराजांचा आदर्श केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महाराजांनी बाणेदारपणे औरंगजेबाला उत्तर दिले त्या आग्राच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. राज्य शासन पर्यटन विभागामार्फत शिवनेरीच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करीत आहे. शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान आहे.
शक्ती आणि युक्तीच्या आधारे स्वराज्याची निर्मिती
शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्रे महाराजांच्या रणनितीचा भाग होती. त्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रजेचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न केले. रयतेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. रयतेच्या रक्षणासाठी, हितासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही. दूरदृष्टीने गडकोट बांधले. ते कुशल प्रशासक, संघटक होते. त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, भाषा, महसूल, शासन, प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली. त्यांच्या पराक्रमापुढे परकियांच्या माना झुकल्या. पेशावर ते तंजावरपर्यंत छत्रपतींचा भगवा डौलाने फडकला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काढले.
शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत पूर्ण होईल
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. वढू, तुळापूरचाही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल. शिवनेरी येथे शिवप्रभुंचे दर्शन घ्यायला कोणालाही अडथळा, बंदी नसेल. शिवजन्मोत्सवाचे अधिक चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बृहद कार्यक्रम- उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवराय होते म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, मानाने जगतो. शासनाने सर्व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दरवर्षी 3 टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. किल्ल्याच्या वेगळ्या निधीव्यतिरिक्त हा निधी असल्याने संवर्धनासाठी निधीची कमतरता नसेल. शिवजन्मस्थानाच्या दर्शनाबाबत योग्य नियोजन करण्यात येईल.
शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासंदर्भात बृहद असा कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून 1 वर्ष सातत्याने महाराजांचा विचार, स्मारके आणि महाराजांचे तेज जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सरकार करेल. रायगड येथे उत्खननात वेगवेगळ्या गोष्टी सापडत असून नवा इतिहास समोर येत आहे. अशाच प्रकारचे काम शिवनेरी येथेही होईल. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढू, तुळापूर साठी 397 कोटी रुपयांचा आराखडा केला असून तेथेही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.
यावेळी जुन्नर येथील छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाड्याच्या पथकाने मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिवनेरी भूषण पुरस्कार ह.भ.प. नामदेव महाराज घोलप यांना मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. आयर्नमन म्हणून पुरस्कार मिळवलेल्या मंगेश चंद्रचूड कोल्हे तसेच खेळाडू संदेश नामदेव भोईर यांनाही शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिलिंद मधुकर क्षीरसागर यांना देण्यात आला. यावेळी ‘शिवचरित्रातून काय शिकावे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबल यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
पालकमंत्री यांच्याकडून शिवाजी महाराजांना वंदन
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन शिवरायांना वंदन केले.